Cityblog Live

CityBlog is back with all fresh local news, views, opinions, jobs, food and entertainment. Do send us your blog contributions to us for publishing at cityblogpuneonline@gmail.com

Wednesday, January 16, 2019

Cityblog : From Past: Appa Balwant Chowk

पुणे शहराचा नावाजलेला भाग असणारा , ' हार्ट ऑफ द सिटी 'मध्ये मोडला जाणारा ''अप्पा बळवंत चौक'' . आता इंग्रजीच्या भडिमारात व शॉर्टफॉर्मच्या जमान्यात हल्ली हा चौक A.B.C. म्हणून ओळखला जातो . पुस्तकांची आणि इतर गोष्टींची दुकाने , ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिर व दगडूशेठ गणपती मंदिर , हुजूरपागा व नू.म.वि. या शाळा , प्रभात-रतन-वसंत ही चित्रपटगृहे , अनेक महत्वाचे रस्ते या चौकाजवळ असल्याने हा भाग सतत रहदारीचा व गजबजलेला असतो . पण मग या चौकाच्या नावामागची कथा काय ? हे अप्पा बळवंत कोण होते ? चला तर या नावामागे दडलंय काय... याचा शोध घ्यायचा हा छोटासा प्रयत्न . 
तर हे अप्पा बळवंत म्हणजेच 'कृष्णाजी बळवंत मेहेंदळे' . त्यांचे वडील बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे एक प्रमुख सेनापती होते . अत्यंत कुशल लढवय्ये असणाऱ्या बळवंतरावांनी त्यांच्या कारकिर्दीत पराक्रम गाजविला होता . पण दुर्दैवाने ते १७६० मध्ये पानिपत रणसंग्रामात मरण पावले . अब्दालीने त्यांचे शिर सदाशिवभाऊंना भेट म्हणून पाठवले होते . त्यांची पत्नीही तिथे सती गेल्या . तेव्हा या अवघ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन कृष्णाजी उर्फ अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी घेतली . 
                  एके दिवशी सवाई माधवराव पेशवे पर्वतीहून शनिवारवाड्याकडे हत्तीवरून परतत होते . त्यांच्याबरोबर त्यावेळेस अंबारीत अप्पा बळवंत हे देखील होते . त्यावेळेस येताना पेशवे यांना भोवळ आली . आणि सवाई माधवराव पेशवे खाली पडणार तोच मागे बसलेल्या अप्पा बळवंतांनी प्रसंगावधान दाखवून त्यांना सावरले , या अपघातातून वाचविले . पेशवे खाली पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता . आपल्यावरील संकट टळले म्हणून हा प्रसंग जेथे घडला , ती जागा अप्पा बळवंतांच्या नावाने ओळखली जाईल , असे सवाई माधवराव पेशवे यांनी जाहीर केले . तर ही आहे या चौकाच्या नावामागची आख्यायिका . १७९८ मध्ये अप्पा बळवंतांचे निधन झाले . 
पुढे याच चौकात म्हणजे आत्ताच्या किबे लक्ष्मी थिएटर समोर सरदार बळवंत मेहेंदळ्यांनी इ.स. १७६१ च्या आधी ३ मजली ४ चौकी असा भव्य वाडा उभारला होता असे कळते . या वाड्यातील एक भुयार थेट शनिवारवाड्यापर्यंत होते . काही गुप्त बैठका घ्यायच्या असतील तर पेशवे या भुयारातून मेहेंदळ्यांकडे येत . भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना याच वाड्यात आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३२ म्हणजे ७ जुलै १९१० रोजी झाली . याप्रसंगी सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे दोघेच उपस्थित होते . काळाच्या ओघात येथे रस्ता रुंदीकरणात त्यांच्या वाड्याचा जवळपास सगळाच भाग त्यात गेला . परंतु आज अप्पा बळवंत हे नाव मात्र चौकाच्या निमित्ताने राहिले आहे .

No comments:

Post a Comment